औरंगाबाद – संयुक्त अरब अमिराती येथे सध्या सुरु असलेल्या आयपीएल 20-20 अर्थात इंडियन प्रीमिर लीग क्रिकेट मॅचवर मोबाइल ऑनलाइन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून सट्टा लावणारे सहा जणांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील सिटी चौक पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोबाइल आणि 89 हजार 300 रुपये रोख जप्त औरंगाबाद करण्यात आले.
याविषयी अधिक माहिती अशी की, सिटी चौक पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद यांना गुप्त बातमीरामार्फत या परिसरात काहीजण क्रिकेटवर सट्टा लावत असल्याची माहिती मिळाली. पोस्ट ऑफिससमोरील जुनाबाजार मेमन इंटरप्राइज येथील किराणा दुकानासमोर हा जुगाराचा खेळ सुरु असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. आयपीएल ट्वेंटी-ट्वेंटी मधील क्रिकेट मॅचवर मोबाइल ऑनलाइन अॅप्लीकेशनद्वारे सट्टा घेऊन लोकांना जुगार खेळण्यात प्रोत्साहित केले जात होते. तसेच पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. सय्यद यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना दिली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार, संबंधीत जागेवर जाऊन छापा टाकला. बुधवारी म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जुनाबाजार येथे पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत महमंद यासेर महंमद याकुब, शेख आसेफ शेख रहीम यांना जुना बाजार येथून ताब्यात घेतले. तर मध्यरात्री 12 वाजेनंतर सातारा परिसरातील आयबीआय बिल्डिंगमधील फ्लॅटमधून तरबेज खान करीम खान, शेख अली उर्फ अलीम पिता शेख महेमूद, मनोज हिरालाल परदेशी आणि शेख मतीन शेख महेमूद यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता साथीदार आरोपी जुबेर शहा- भोकरदन यांच्या सांगण्यावरून हे सहा जण विना परवाना अवैधरित्या मोबाइलवर लोकांकडून पैसे घेत सट्टा लावत असल्याचे उघड झाले. सध्या सुरु असलेल्या आयपीएलवर लोकांकडून मॅचवर टॉस, सेशन, विन मॅच या कोडद्वारे बेटिंग घेऊन पैशांवर सट्टा लावून लोकांना प्रोत्साहित करत होते. या सट्ट्यातून मिळणाऱ्या पैशांचे व्यवहार आरोपींच्या फोन पे अकाउंटवरून करण्यात येत होते. यासाठी वेगवेगळ्या फोन पे अकाउंटचाही वापर केला जात होता. या सहा जणांकडून पोलिसांनी मोबाइल, इतर साहित्य आणि 89 हजार 300 रुपये रोख जप्त केले आहेत.