औरंगाबाद प्रतिनिधी | सचिन जिरे
पैठण शहरातील गोदावरी वाळवंटातून वाळूची वाहतुक करणार्या ३५ गाढवानां पैठण पोलिसांनी आज ताब्यात घेतले. तीन तासानंतर ताब्यात असलेली सर्व गाढव पोलिसांनी महसूल विभागाच्या स्वाधीन केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी दिली. पकडलेली गाढव ठेवायची कुठे असा प्रश्न महसूल विभागापुढे ठाकल्याने तलाठी भैरवनाथ गाढे यांनी कुठलीही कारवाई न करता पकडलेली सर्व गाढवे सोडून दिली.
पोलीसांच्या या कारवाई मुळे गाढवावरुन वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नाथषष्टीनिमित्याने नाथ मंदीरा पाठीमागील गोदावरी पात्रातील पाणी खाली सोडुन देण्यात आल्याने पात्र कोरडे ठाक पडले आहे. याचा फायदा घेत काही वाळू तस्कर पात्रातील वाळू उपसा करुन गाढवाच्या सहाय्याने वाहतुक करुन विक्री करत आहेत. पोलिसांनी यापुर्वी सुचना देऊनही ही वाळू वाहतूक थांबत नसल्याने बुधवारी पोलिसांनी सकाळ पासुन ते दुपार पर्यंत वाळु वाहतुक करणाऱ्या ३५ गाढवानांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्याच्या आवरात डांबून ठेवले होते. गाढव कोणाच्या मालकीचे आहेत याचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान ताब्यात घेतलेली सर्व गाढव पोलिसांनी महसुल विभागाला स्वाधीन केले. गाढवावरुन वाळु वाहतुक गेली अनेक वर्षांपासून राजरोस सुरू आहे. आतापर्यंत पोलिस वाळू चोरी प्रकरणी ट्रक टँक्टर, हायवा, आदी वाहणाविरुध कारवाई करत. मात्र पोलीस गाढवावर सुध्दा कारवाई करतात हे पाहुन पैठण शहरातील नागरिक आश्चर्यचकित झाले. शहरात दिवसभर या कारवाई ची नागरीकांत चर्चा सुरू होती.