कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पेट्रोलिंग करत असताना एका पोलिसाला रस्त्यात आज्जीबाई भेटल्या. कुठे चाललाय म्हणून विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, घरात आठ दिवसापासून गोडेतेल नाही. त्या पोलिसाने त्यांना दुसऱ्या दिवशी विजय दिवस चौकात बोलावून गोडेतेलाची पिशवी दिली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि खाकीतल्या माणुसकीचे दर्शनही घडले.
कराडमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या पन्नाशीपार गेली आहे. त्यामुळे कराड, मलकापूरसह आसपासची गावे पुर्णत: बंद आहेत. लॉकडाऊनमधील बंदोबस्तावेळी शिवाजी हौसिंग सोसायटीत पेट्रोलिंग करताना कराड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार मारूती चव्हाण यांना रस्त्यात भेटलेल्या आज्जीने घरातील परिस्थिती सांगताच त्यांच्या मनात कालवाकालव झाली. त्यांनी त्या आज्जीला दुसऱ्या दिवशी सकाळी विजय दिवस चौकातील पोलीस चौकीजवळ यायला सांगितले.
सकाळी एक दुकानदार शटर बंद करुन यादीप्रमाणे साहित्य बांधत होता. त्याला गोडेतेलाची पिशवी मागितली. पिशवीची किंमत होती १०० रूपये. हवालदार चव्हाण यांच्या खिशात ६० रूपये होते. त्याचवेळी तेथून निघालेल्या हवालदार खराडे यांच्याकडून बाकीचे पैसे मागून घेतले. गोडेतेलाची पिशवी विकत घेतली. सकाळी १० वाजता ती आज्जी चौकात आली. हवालदार चव्हाण यांनी गोडेतेलाची पिशवी त्यांना दिली. त्यावेळी त्या आज्जीच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी पोलीस आहे म्हणून त्या आज्जीला मला मदत करता आली.
गोडेतेलाची पिशवी केवळ १०० रूपयांची होती, पण तिच्या चेहऱ्यावरील समाधान लाखमोलाचे होते, अशी प्रतिक्रिया हवालदार मारूती चव्हाण यांनी व्यक्त केली. आपल्या कर्मचाऱ्याने एका वृद्ध महिलेला केलेल्या मदतीबद्दल वरिष्ठांना समजताच पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी हवालदार चव्हाण यांचे कौतुक केले.