अमरावती : हॅलो महाराष्ट्र – आपल्या युनिफॉर्ममध्ये आणि सरकारी पिस्तुल हातात घेऊन व्हिडिओ तयार करणं, एका हवालदाराला चांगलेच महागात पडले आहे. गुंडांनी दादागिरी करू नये, असा संदेश देण्याचा प्रयत्न या हवालदारानं केला असला, तरी अशा प्रकारे व्हिडिओ बनवणं, हे नियमबाह्य असल्याचा आरोप करत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारमध्ये कार्यरत असलेल्या हवालदार महेश मुरलीधर काळे यांनी हातात पिस्तुल घेऊन एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये ते वर्दी घालून आणि हातातील पिस्तुल कॅमेऱ्यावर रोखून तयार केलेल्या या व्हिडिओत हवालदार काळे हे गुंडांना कायदा हातात न घेण्याचा इशारा देत होते. जो कायदे मे रहेगा, वो फायदे मे रहेगा असं सांगत अमरावतीत येताना गुंडगिरी आणि दादागिरी 10 किलोमीटर लांब ठेऊन येण्याचा इशारा त्यांनी गुंडांना दिला होता. तसेच अमरावती हा कायद्याचा बालेकिल्ला असून गुंडगिरी करणाऱ्यांची खैर नाही, असा इशाराच त्यांनी या व्हिडिओतून दिला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांनी काळे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे.
पिस्तुल दाखवणे भोवले
कायद्यानुसार सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचं जाहीर प्रदर्शन करणं नियमबाह्य आहे. अशा प्रकारे पोलीस खुलेआम बंदूक हातात घेऊन व्हिडिओ करू लागेल, तर त्यातून पोलीस दलाबाबत चुकीची प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचते. असं वरिष्ठ पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे काळे यांच्या या व्हिडिओवर आक्षेप घेत त्यांनी निलंबन केले आहे.