उलटा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या 500 पर्यटकांवर पोलिसांची कारवाई, 1 लाखाहून अधिकचा दंड वसूल

पाटण पोलिसांची कारवाई, सडावाघापूर येथे न जाण्याचे पर्यटकांना आवाहन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रसिद्ध असलेला सडावाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सडा वाघापूर येथे येत आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. मात्र तरीदेखील मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनस्थळावर येत असल्याने पाटण पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी 500 पर्यटकांवर कारवाई केली आहे.

पावसाळा सुरू झाल्यानतर सडावाघापूर येथील धबधबा हा उलटा वाहत असतो. या उलट्या वाहणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात चिंब भिजण्यासाठी पठारावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत. परंतु शासनाच्या नियमानुसार कोरोना असल्याने पर्यटन क्षेत्रावर जाण्यास बंदी आहे. तरीही काही पर्यटक नियमांचे उल्लघंन करत जात आहेत. पाटण तालुक्यातील सडावाघापूर येथे आतापर्यंत 1 लाखाहून अधिक दंड पोलिसांनी वसूल केला आहे.

सडावाघापूर येथे जाण्यासाठी उंब्रज येथून चाफळ मार्गे आणि पाटण व तारळे येथून जाण्यासाठी मार्ग आहे. पोलिसांनी अनेकदा आवाहन करूनही पर्यटक जात असल्याने कारवाईचा दडुंका उगारला आहे. या कारवाईमुळे पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. तेव्हा पर्यटकांनी पर्यटनस्थळावर गर्दी न करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी केलं आहे..

You might also like