तलवार, सुरा, एअरगन बाळगणाऱ्यांस पोलिस कोठडी

कराड शहर पोलिसांकडून संशयितांच्या कार्वेतील घराचीही झडती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य शाखेच्यासमोर रस्त्यावर बिगर नंबर प्लेटच्या मोटारसायकलसह उभा असलेल्या संशयितास कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून दोन तलवारी, दोन सुरे, एक एअरगन, मोटारसायकल व मोबाईल असा सुमारे 23 हजार 350 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बालाजी सुभाष सोनकांबळे (वय 23, रा. शिवणखेड, ता. अहमदपूर, जि. लातूर, सध्या रा. कार्वे, ता. कराड) असे पोलीस कोठडी मिळालेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत होणार्‍या गुन्हांना प्रतिबंध करण्याकरीता पोलीसांची पथके तयार करण्यात आलेली होती. दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार सुनिल पन्हाळे व पोलीस नाईक संजय जाधव तहसीलदार कार्यालय ते भेदा चौक जाणारे रस्त्यावर पेट्रोलिंग करताना असताना जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य शाखेचे समोर रस्त्यावर बिगर नंबर प्लेटच्या मोटार सायकलसह एक संशयित उभा असलेला दिसला. सदर इसमाकडे पोलिसांनी विचारपूस केली असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक सुरा व मोटारसायकल व त्याची नंबर प्लेट मिळून आली.

संशयितास पोलीस ठाण्यात आणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासमोर हजर केले असता संशयित इसम याचेकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचे कार्वे (ता. कराड) येथील घराची घरझडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्या घरात दोन तलवारी, दोन सुरे, एक एअरगन तसेच मोटारसायकल व मोबाईल असा सुमारे 23 हजार 350 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मिलिंद बैले करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विवेक गोवारकर, सुनिल पन्हाळे, पोलीस नाईक संजय जाधव, तानाजी शिंदे, संजय लादे, विनोद माने यांनी केली.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like