Tuesday, June 6, 2023

बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात, शेतकऱ्यांचे आंदोलन प्रशासनाने दडपलं

मुंबई प्रतिनिधी । राज्यात अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. या पावसानं संपूर्ण खरीप हंगामातील सर्व पिकांचे नुकसान केलं आहे. अशा परिस्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू यांनी विधानभवन परिसरात आंदोलन पुकारले होते. मात्र, पोलिसांनी विधानभवन परिसरात आंदोलनकाना अडवत आमदार बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं.

या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी अपंग नागरिक सामील झाले होते. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीला धरत शेतकरी आक्रमक होते. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्च केला. पोलिसांनी आदोलकांना ताब्यात घेत आझाद मैदानावर नेलं असल्याची माहिती मिळत आहे.

ओल्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक आहेत. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदतीची गरज आहे. तेव्हा राज्यपालांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी प्रहार संघटनेची आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास थेट राजभवनावर धडकणार असल्याचे बच्चू कडू यांनी याआधीच सांगितलं आहे.