थकीत बिलासाठी संतप्त शेतकर्‍यांचा तासगावात रस्ता रोको, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झाली जोरदार झटापट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने थकविलेल्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या ऊस बिलांसाठी संतप्त शेतकर्‍यांनी तासगावात खासदारांच्या घरावर हल्लाबोल केला. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. एकतर ऊसबिल द्या नाहीतर आम्ही सर्व शेतकरी तासगावातील चौकात सामुदायिक आत्महत्या करू, असा आक्रमक पवित्रा घेतला. घटनास्थळी खासदार संजयकाकांनी भेट देऊन 2 फेब्रुवारीपर्यंत बिले देतो, असा तोडगा काढण्याच्या प्रयत्न केला. मात्र परंतु वारंवार खोटी आश्वासने दिल्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या आश्वासनाकडे पाठ फिरवून तहसीलवर ठिय्या देत आंदोलन स्थगित केले.

सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील हे गेल्या वर्षभरापासून ऊस बिलासाठी शेतकर्‍यांना खोटी आश्वासने देऊन फसवत आहेत. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची अजूनही कोट्यवधी रुपयांची बिले थकीत आहेत. ही बिले तातडीने द्यावीत, अशी शेतकर्‍यांची मागणी होती. यावेळी संजयकाका पाटील यांनी मोर्चातील शेतकर्‍यांची भेट घेऊन आपल्या अडचणी सांगितल्या. येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत बिले देण्याचे आश्वासन दिले. मात्र शेतकर्‍यांना हे आश्वासन मान्य नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यांनी जोपर्यंत ऊस बिले मिळत नाहीत तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची सुमारे 18 कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत.

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. मात्र चिंचणी नाक्यात पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्याठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलीस खासदारांच्या घराकडे जाऊ देत नसल्याने शेतकर्‍यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. त्यामुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, जर खासदार आंदोलनाच्या ठिकाणी आले नाहीत तर शेतकरी सामुदायिक आत्महत्या करतील, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला. त्यानंतर काही वेळातच खासदार आंदोलनस्थळी आले. यावेळी आक्रमक शेतकर्‍यांनी खासदारांना फैलावर घेतले. अगदी एकेरीत शेतकरी बोलत होते.

Leave a Comment