धक्कादायक! पोलीस पाटलाची शेतकऱ्याला कुऱ्हाडीने मारहाण; कराड तालुक्यातील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

शेतातील घास गवतातून ट्रॅक्टर का नेला, असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जावून पोलीस पाटील याने गावातीलच एकाच्या हातावर कुऱ्हाडीने मारहाण केल्याची तर इतरांनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना हवेलीवाडी-सवादे ता. कराड येथे शनिवार दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अनिल राजाराम एैर वय ४१ रा. हवेलीवाडी-सवादे ता. कराड असे मारहाणीतील जखमीचे नाव आहे. पोलीस पाटील श्रीकृष्ण पांडूरंग नलवडे, हणमंत पांडूरंग नलवडे, यशवंत मारूती नलवडे, राहुल मारूती नलवडे, महादेव ज्ञानू एैर, सुनिल उर्फ सोन्या राजाराम नलवडे अशी या गुन्ह्यातील संशयीतांची नावे आहेत.

याबाबत अनिल राजाराम एैर यांनी कराड ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडील माहिती अशी, अनिल एैर व त्यांच चुलत भाऊ  सुनिल महादेव एैर हे नालगौंडी शिवारात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उसाला पाणी पाजण्याच्या पाईप जोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात तोडलेली झाडे नेण्यासाठी गावचा पोलीस पाटील श्रीकृष्ण नलवडे याने ट्रॅक्टर बोलवला होता. संजय येरळेकर हा चालक ट्रॅक्टर घेवून आला. त्याने अनिल एैर यांच्या शेतातील घास गवतातून ट्रॅक्टर नेला. त्यामुळे अनिल यांनी त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्यामुळे चिडून जावून श्रीकृष्ण नलवडे याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने अनिल एैर यांच्या डाव्या हातावर मारहाण करून त्यांना जखमी केले.

नलवडे याच्यासोबतच्या हणमंत पांडूरंग नलवडे, यशवंत मारूती नलवडे, महादेव ज्ञानू एैर यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. तर राहुल मारूती नलवडे, सुनिल उर्फ सोन्या राजाराम नलवडे यांनी अनिल एैर यांचे चुलतभाऊ सुनिल एैर व शंकर एैर यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, असे अनिल एैर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी श्रीकृष्ण नलवडे याच्यासह सहाजणांविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार सुर्यकांत खिलारे करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment