धुळे- सोलापूर महामार्गावर कंटेनरच्या धडकेत पोलीस पाटलाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पांढरी पिंपळगाव परिसरात स्कुटीला कंटेनर वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी-पिंपळगाव शिवारात दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. नारायण पंडितराव राऊत (वय 70, रा.हर्षी खुर्द ता. पैठण) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस पाटलाचे नाव आहे.

या अपघाताविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील हर्षी खुर्द येथील पोलिस पाटील नारायण राऊत हे त्यांच्या औरंगाबाद शहरामध्ये राहत असलेल्या घरी पत्नी व मुलाला भेटण्यासाठी घरून हर्षीहुन (आडूळ मार्गे) औरंगाबादकडे एकटेच आपल्या स्कूटीने (एमएच 20 ईक्यु 5404 ) जात असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी-पिंपळगाव शिवारात बीडहुन औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनर वाहनाने ( एचआर 38 एबी 9477 ) त्यांच्या स्कूटी दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की राऊत हे कंटेनरच्या धडकेत चिरडले गेले. राऊत यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. ते घटनास्थळीच जागीच ठार झाले. हा भीषण अपघात घडताच कंटेनर चालकाने वाहन घटनास्थळी न थांबविता तसेच राऊत यांची अपघातग्रस्त स्कूटी दुचाकी अपघातग्रस्त कंटेनरला जाम गुंतुन जवळपास तब्बल सात किलोमीटर अंतरापर्यंत निर्दयीपणे फरफटत आणली. मात्र घटनास्थळी असलेल्या काही युवकांनी पाठलाग करत चित्तेपिंपळगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने त्या वाहनाचा पाठलाग करून वाहनासह चालकाला चित्तेपिंपळगाव येथे पकडले.

या अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस, चित्तेपिंपळगाव येथे व करमाड पोलिस घटनास्थळी लगेचच दाखल झाले होते. या अपघाताची नोंद करमाड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास करमाड पोलिस करीत आहेत. मृत नारायण राऊत यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी हर्षी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

 

Leave a Comment