मोठी बातमी!! शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. कोल्हापुरचे खासदार आणि छत्रपती शाहू महाराज याना (Chhatrapati Shahu Maharaj) विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे. रविवारी विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला हिंसक वळण लागलं होते. जमावानं विशाळगडावर दगडफेक आणि जाळपोळ केली. यात अनेक घरे, वाहनांचे नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर आज शाहू महाराज विशाळगडाच्या पाहणीसाठी निघाले होते मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं आहे. पत्रकारांना सुद्धा त्याठिकाणी पोलिसांकडून रोखण्यात आले. यावेळी पोलीस आणि पत्रकाराच्या बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे.

विशाळगडावरील हिंसाचारानंतर खासदार शाहू छत्रपती यांनी काल विशाळगडाची पाहणी करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणं शाहू महाराज विशाळगडाच्या परिसराची करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पांढरेपाणी येथे रोखलं. शाहू महाराज यांच्यासोबत काँग्रेस आमदार सतेज पाटील हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. मात्र जमावबंदीचे कारण सांगून पोलिसांनी शाहू महाराजांना गडावरून जाण्यापासून रोखलं. यानंतर शाहू महाराजांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिक पत्रकाराना सुद्धा रोखण्यात आल्यानंतर पोलीस आणि पत्रकार यांच्यातही खडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली ज्यांची घरं पेटवली,वाहनांचं नुकसान झालं त्याची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्यांना रोखताय. ज्यांनी नुकसान केलं त्यांना काहीच करत नाही, असं सतेज पाटील म्हणाले. आम्ही शांतता प्रस्थापित करायला जात आहोत. शिधा आणला आहे, आम्हाला केवळ 15 लोकांना तिथं जाऊद्यात, असं सतेज पाटील म्हणाले. 15 लोकांना सोडायची लोकशाहीत परवानगी नाही का असा सवाल सुद्धा सतेज पाटलांनी पोलिसांना केला.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहू महाराजांना विशाळगडकडे जाण्यापासून अडवणूक केली जाते ही दुर्दैवाची बाब आहे, असं म्हटलं. ज्या शाहूंनी देशाला समता शिकवली त्यांच्या वारसाला अडवलं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांना अडवायला पाहिजे होत त्यांना अडवलं नाही. हा सरकारचा प्लॅन आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला.