पोलिसांचा दणका : सातारा जिल्ह्यातील 5 टोळ्यातील 15 जण एकाचवेळी तडीपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा शहरासह जिल्ह्यातील फलटण, उंब्रज, शिरवळमधील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये पोलिसांनी धडाका करत एकाचवेळी 15 जणांना तडीपार केले आहे. स्थानिक पोलिसांच्या प्रस्ताव सत्रामुळे व कारवाईच्या दंडूक्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिस अधिकारी अण्णासाहेब मांजरे, बी. के. किंद्रे, अजय गोरड, उमेश हजारे यांनी प्रस्ताव तयार करुन ते पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे पाठवले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी संशयितांवर तडीपारची कारवाई केली.

सातारा शहरातील दुचाकी चोरीप्रकरणी प्रल्हाद ऊर्फ परल्या रमेश पवार (वय 19, रा. केसरकर पेठ), विकास मुरलीधर मुळे (20, रा. पावर हाऊस झोपडपट्टी, मंगळवार पेठ) या टोळीला सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

फलटण शहरात बेकायदा गायी, म्हैस या जनावारांची कत्तल करणे तसेच बेकायदा वाहतूक करून त्याची विक्री केल्याप्रकरणी तय्यब आदम कुरेशी (36), हुसेन बालाजी कुरेशी (47), जमील मेहबूब कुरेशी (42), सद्दाम हसीन कुरेशी (27), अरशद जुबेर कुरेशी (25), अमजद नजीर कुरेशी (41, सर्व रा. फलटण शहर) या टोळीला पूर्ण सातारा जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर तालुक्यांतून 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे. दरम्यान, फलटण शहरात गर्दी, मारामारी, बेकायदा शस्त्रे बाळगणे, हातभट्टी दारूनिर्मिती प्रकरणी सनी माणिक जाधव (26), गणेश महादेवराव तेलखडे (37, दोघे रा. मलठण ता. फलटण) या टोळीला 1 वर्षासाठी सातारा जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर यामधून तडीपार करण्यात आले आहे.

उंब्रज पोलिसांनी जबरी चोरी व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राकेश ऊर्फ मुन्ना जालिंदर घाडगे (32, रा. कदममळा, उंब्रज), शंकर उर्फनाना लक्ष्मण शितोळे (वय 29, रा. आंधारवाडी (ता. कराड), सोन्या उर्फ अनिकेत आदिक चव्हाण (वय 20, रा. आंधारवाडी) या टोळीला 1 वर्षासाठी सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.

शिरवळमध्ये गर्दी करून मारामारी व उद्योजकांमध्ये दहशत तयार करणाऱ्या संजय तुकाराम ढमाळ (वय 53), योगेश दादासाहेब ढमाळ (वय 28, दोघे रा. केसुर्डी ता. खंडाळा) या टोळीला 1 वर्षासाठी सातारा जिल्हा व पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. स्थानिक पोलिस अधिकारी यांनी संशयितांना वेळोवेळी सुधारण्याची संधी दिली. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती. उलट सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे ही कारवाई करण्यात आले.

Leave a Comment