औरंगाबाद | सोमवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी औरंगाबाद येथे शहर पोलीस दल आणि परिक्षेत्राच्या आढावा बैठकीत वाळूज, विमानतळ, ऑरिक सिटीत लवकर नवीन पोलीस ठाणे होणार असल्याचं स्पष्ट केले आहे. ऑरिक सिटी, वाळूज, विमानतळ याठिकाणी पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रस्ताव अजूनही पोलीस महासंचालक कार्यालयातच अडकून आहे. हा प्रस्ताव शासनाकडे जाताच याला तात्काळ मान्यता देण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर ई-कॉमर्सद्वारे तलवार किंवा ड्रोनची विक्री होत असल्याच्या काही घटना मागे घडल्या होत्या त्या घटनेचा पाठपुरावा एटीएस करणार आहे. लवकरच याबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे महासंचालक संजय पांडेय यांनी सांगितले आहे.
आर्थिक, सायबर गुन्ह्यात वाढ
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची बदनामी होत आहे. त्याचबरोबर दोन समाजामध्ये वादावादी आणि गावात संघर्ष निर्माण होण्याच्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी ग्रामीण पोलिसांनी भर दिला याबाबत त्यांनी पोलिसांचे कौतुकही केले. ‘कोरोनामुळे मृत पावलेल्या पोलिसांच्या अनुकंपा भरती बद्दल सरकारचे धोरण अजून सुस्पष्ट असून हा निर्णय आयुक्त स्तरावर आणि पोलीस अधीक्षक स्तरावर होईल. त्याचबरोबर कोरोना युद्धांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीला पन्नास लाख रुपये दिले आहे’ असेही वळसे-पाटील म्हणाले.
दरम्यान, शहरातील रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीचा आयुक्तालयातील नियंत्रण विभाग पाहिल्यानंतर एखादा रस्ता झुम करुन दाखवा अशा सुचना गृहमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या असता पोलिसांनी शहरातील रस्त्यावरील सीसीटीव्ही झुम करुन दाखविला. पोलिसांना चांगले कार्यालय, घर मिळावे यासाठी पूर्णपणे मदत करणार आहे, असेही ते म्हणाले.
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी दौलताबाद येथील फार्महाऊसवर संचार बंदी असताना देखील कव्वाली पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कव्वालीच्या कार्यक्रमांमध्ये खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी होते. याबाबत एका पत्रकाराने विचारले असता आयोजकांसह उपस्थितांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. असे म्हणत यांनी सारवासारव केली.