‘सांगली बंद’ला सुप्रिया सुळेंनी दर्शविला विरोध; राजकीय षडयंत्र असल्याचा केला आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे.

राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून साताऱ्यानंतर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे. संभाजी भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संघटनेनं आज पुकारलेल्या सांगली बंदला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध दर्शवला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असताना पुकारण्यात आलेला हा बंद म्हणजे राजकीय षडयंत्र आहे,’ असा थेट आरोप सुळे यांनी केला आहे.

याबाबत सुळे यांना विचारलं असता, हा बंद चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मुख्यमंत्री आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. नेमका त्याच दिवशी हा बंद पुकारण्यात आलाय. यामागे निश्चितच राजकीय षडयंत्र आहे, असं त्या म्हणाल्या. ‘ज्या शिवछत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं. त्यांच्या नावाचा वापर करून बंद करणं मला अयोग्य वाटतं,’ असं त्यांनी भिडे यांना नाव न घेता सुनावलं.

Leave a Comment