मुंबई : कर्जमाफीचा अर्ज करण्यासाठी बँकेत आलेल्या शेतकर्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाना जिल्ह्यातील दातार गावात घडला आहे. पिडित शेतकरी कर्ज माफीसाठीचा अर्ज भरण्याकरता गावातील सेंट्रल बँक आॅफ इंडीयामधे गेला असता त्याने त्याची व त्याच्या पत्नीची वैयक्तिक माहिती अर्ज भरतेवेळी बँकेत जमा केली होती. बँकेच्या शाखाधिकार्याने त्या माहितीचा दुरउपयोग करत परस्पर शेतकर्याच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक घेऊन शरिरसुखाची मागणी केली आहे.
“बुलढाण्यात घडलेला प्रकार पुरोगामी महाराष्ट्रावर लागलेला कलंक आहे” असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. कर्ज मंजुर करुन देण्यासाठी शेतकरी भगिनीकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक अधिकारीच खर्या अर्थाने या असंवेदनशील आणि शेतकरीद्वेश्या सरकारचा प्रतिनिधी असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. शेतकर्यांना कर्जमाफीचा अर्ज भरतेवेळी विनाकारण अनावश्यक कागदपत्रे बँकांत नेऊन द्यावी लागतात. यातूनच हा प्रकार घडला आहे. तेव्हा सरकारने शेतकर्यांचा छळ थांबवावा व महाराष्ट्रातील शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच दोषी अधिकार्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी जयंत पाटील यांनी केली आहे.