तडजोडीमध्ये झारीतील शुक्राराचार्य असल्याचा विशाल पाटील यांचा आरोप.
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
वसंतदादा पाटील घराण्याने सांगलीत कॉंग्रेस जिवंत ठेवली. गेल्यावेळचा अपवाद वगळता सर्व निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला. मात्र सांगलीची जागा आता मित्रपक्षाला सोडत आहेत. दादा घराण्याला संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तडजोडीमध्ये झारीतील शुक्राराचार्य असल्याचा आरोप कॉंग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता केला. सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस कमिटीसमोर निदर्शने करत कॉंग्रेस कमिटीला टाळे ठोकले. यावेळी पत्रकारांशी बोलताना विशाल पाटील म्हणाले, सांगलीची जागा मित्रपक्षाला देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
या मतदारसंघात १२ वेळा विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीत काही अंतर्गत गटबाजी व लाटेत अपयश आले होते. ही जागा दादा घराण्याने जिवंत ठेवून पक्ष वाढवला आहे. मात्र दुसऱ्याला जागा सोडणे पक्षाला शोभत नाही. खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे या मतदारसंघात अस्तित्व नाही. त्यांच्या उमेदवाराची या ठिकाणी अनामत रक्कम जप्त होईल. त्यांनी जागा मागणे गैर नाही. पण ही जागा दादा घराण्याची आहे. या तडजोडीमध्ये झारीचा शुक्राचार्य असल्याचा आरोप त्यांनी केला. दादा घराणे संपविण्याचा हा प्रकार सुरू आहे.
मध्यतंरी देखील हा प्रकार सुरू आहे. मात्र आम्ही शांत बसणार नाही. दादांची ताकद दाखवणार असल्याचा इशारा विशाल पाटील यांनी दिला. ते पुढे म्हणाले, लोकसभेसाठी कदम कुटुंबियात कोण इच्छूक असतील तर त्यांनी सांगावे आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडू त्यांना मदत करू, जर ते इच्छूक नसतील तर त्यांनी उमेदवार सांगावा आम्ही त्यांचे काम करू, असे स्पष्ट करत विशाल पाटील म्हणाले, पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा तर काय ग्रामपंचायत ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक लढू अशा ठाम विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.