सांगलीत मतदान शांततेतच मात्र सोशल मिडीयावर आफवांचे पेव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे,

सांगली लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी सोशल मिडियातून मात्र अफवांच्या बाजाराला ऊत आला होता. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विश्वजीत कदम यांना बसला. त्यांच्या पाठींब्याचे व त्यांच्या नावाने अनेक जुने फोटो व व्हिडीओ व्हायरल केले जात होते. दरम्यान प्रशासकीय पातळीवरही अनागोंदीचा सामना मतदारांना करावा लागला.

जिल्ह्यात मतदान यंत्रे बंद पडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात झाला तर अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाली होती ज्यांनी महापालिकेत मतदान केले होते अशा हजारो मतदारांची नावे अचानकपणे वगळली गेली होती. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यात तिरंगी लढत झाली. मात्र निवडणुकीच्या पूर्वसंध्येला व निवडणुकीच्या दिवशी अफवांचा ऊत आला होता.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून स्वाभिमानीचे विशाल पाटील यांचा प्रचार केला आहे. अनेक सभा देखील घेतल्या आहेत. मात्र मतदानाच्या पूर्वंसध्येला त्यांचा मोबाईल नंबर हॅक करून विशाल पाटील यांच्या ऐवजी गोपीचंद पडळकर यांच्या कपबशीला मतदान करावे, असे संदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पाठविले. या संदर्भात जयंत पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे. मात्र या झालेल्या घटनेची मंगळवारी दिवसभर सोशल मिडियावर चर्चा सुरू होती. तसेच आमदार विश्वजीत कदम यांच्याबाबतीत देखील हाच प्रकार घडला आहे. विश्वजीत कदम यांच्या स्वीय सहाय्यकांच्या दूरध्वनीवरून त्यांच्या मतदारसंघातील काही सरपंच व प्रमुखांना विशाल पाटील यांच्या ऐवजी गोपीचंद पडळकर यांचे काम करावे, असे एसएमएस गेले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.

Leave a Comment