हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरवर (Pooja Khedkar) केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला IAS सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. यापूर्वी UPSC ने पूजा खेडकरवर कारवाई केली होती, आता केंद्राने सुद्धा तिला बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचं समोर आलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे.
अपंगत्वाची अनेक बनावट प्रमाणपत्र सादर करून तसंच नावात बदल करुन पुन्हा युपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप पूजा खेडकर वर होता. पूजा खेडकर यांनी अपंगत्व दाखवण्यासाठी दोन प्रमाणपत्रे सादर केली. त्यातील एक प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सांगितलं होतं. इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याचे लाभ फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीनं मिळविल्याचा आरोप खेडकर यांच्यावर आहे. पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
Central government discharges Puja Khedkar from Indian Administrative Service with immediate effect: Official sources
— Press Trust of India (@PTI_News) September 7, 2024
यापूर्वी UPSC ने केली होती कारवाई – Pooja Khedkar
UPSC ला फसवण्यासाठी पूजा खेडकरनं (Pooja Khedkar) वारंवार नावं बदलली. केवळ पूजाच नाही, तर तिच्या आईवडिलांचीही नावं वारंवार बदलण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर होता. एवढंच नव्हे तर पूजा खेडकरने परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने सांगितलं. तिने दोन ओळखपत्रांवर दोन वेगवेगळे पत्ते दिले . आधारकार्डवर पुण्यातील नॅशनल हौसिंग सोसायटी औंध पुणे येथील पत्ता दिला आहे तर रेशनकार्डवर आळंदी- देहू रस्ता तळवडे येथील कंपनीचा पत्ता दिला होता. तिचे हे सर्व प्रताप उघड झाल्यानंतर युपीएससीनं तिला नुकतंच सेवेतून बडतर्फ केलं होतं. आता केंद्र सरकारने सुद्धा पूजा खेडकरला थेट प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करत मोठा निर्णय घेतला.