हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शुक्रवारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताना दिसली. अभिनेत्रींच्या अधिकृत ओसशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिचे निधन झाल्याची माहिती देणारी पोस्ट शेअर करण्यात आली होती. यानंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी, मित्र मैत्रिणींनी पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजलीदेखील वाहिली. तिच्या निधनाच्या बातम्या प्रसारित झाल्या. अशातच, आता अभिनेत्रीने स्वतःचा एक व्हिडीओ शेअर करत आपण जिवंत असल्याचे सांगितले आहे.
आपल्या वक्तव्यांमुळे आणि बोल्डनेसमुळे कायम चर्चेत राहणारी मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाल्याच्या बातम्यांना उधाण आले असताना हि बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसोबत मोठा प्रॅन्क करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. तिच्या निधनानंतर चाहत्यांनी दुःख व्यक्त केले होते. मात्र आता तिचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पूनम पांडे ट्रोलिंगची शिकार होताना दिसते आहे. सर्व्हिकल कॅन्सरने वयाच्या ३२ व्या वर्षी पूनम पांडेचे निधन झाल्याची बातमी तिच्या सोशल मीडिया हँडलवर देण्यात आली होती. यावर काही चाहत्यांनी दुःख व्यक्त केले तर काहींनी मात्र पोस्ट खोटी असल्याचे म्हटले होते.
दरम्यान सोशल मीडियावर पूनमच्या निधनाही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. नेटकऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे पूनम पांडेच्या निधनाची पोस्ट फेक ठरली असून तिचा नवा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. अभिनेत्री पूनम पांडेने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केला आहे. यामध्ये तिने, ‘मी जिवंत आहे’ असे सांगितले आहे. पूनमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कडक शब्दांत अभिनेत्रीची कानउघाडणी केली आहे.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पूनमने आपण गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. पूनमच्या निधनाची पोस्ट व्हायरल झाल्यापासून तिच्या कुटूंबियांनी फोन बंद करुन माध्यमांशी संपर्क टाळला होता. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आली नव्हती. ज्यामुळे वेगवेगळ्या अफवा उठल्या.निधनवार्तेची खोटी बातमी पसरवून दिशाभूल केल्याप्रकरणी पूनम पांडे आता अडचणीत येण्याची शक्यता असून व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे.