कोल्हापूर | सतेज औंधकर
बेळगांव जिल्यातील नजीर मकानदार या पोल्ट्री व्यावसायिकाला कोरोनाचा जबरदस्त फटका बसला आहे. सध्या कोरोना व्हायरसने पोल्ट्री व्यवसायकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी पोल्ट्री व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकाने आपल्या पाच हजार जिवंत कोंबड्या जमिनीखाली गाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बाजारात आवश्यकतेप्रमाणे चिकन बॉयलर पक्षांना उठाव नसल्याने बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील लोळसुर गावातील नजीर मकानदार या पोल्ट्री व्यावसायिकाने आपल्या शेतातील 5000 जिवंत बॉयलर कोंबड्या जमिनीखाली गाडल्या आहेत.
एक कोंबडी तयार होण्यास 40 दिवसात 75 रुपये खर्च येतो. मात्र कोरोना विषाणूच्या भीतीपोटी चिकन खाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच होळी , रंगपंचमीच्या निमित्ताने होणारी खरेदी अपेक्षित प्रमाणे झाली नसल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांवर मोठे संकट उभे राहिले आहे.