कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडून नव्याने युनिक पुलाची उभारणी होणार आहे. तसेच कोयना नदीवर असलेला पूलही आता दहा लेनचा होणार आहे. महामार्गावरील कोयना नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाला नुकताच प्रारंभ झाला असून डीपी जैन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप जैन, प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र वर्मा, सीनियर इंजिनिअर शशांक तिवारी, अर्जित बिस्वा, अस्लम खान, धीरेंद्र यादव आदींसह तंत्रज्ञांच्या उपस्थितीत या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली.
कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक कालपासून तीन लेनवर सुरु करण्यात आली. दरम्यान, रात्रीपासून पुलाच्या कामास अधिक गतीने सुरुवात करण्यात आली आहे. या पुलाच्या कामासंदर्भात डीपी जैन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप जैन यांनी माहिती दिली. यावेळी जुने आधीचे पाच लेनचे दोन पूल आणि नव्याने होणारे एक तीन लेनचा व एक दोन लेनचा असा एकूण दहा लेनचा पूल कोयना नदीवर उभारला जाणार असल्याचेजैन यांनी सांगितले. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने या पुलाची बांधणी करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/230844059466126
दरम्यान, नॅशनल हायवे अॅथोरिटीबरोबर येथील उड्डाणपुलाच्या डिझाईन संदर्भात गेली दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती. या डिझाईननुसार देशातील महत्वाच्या पुलामध्ये या पुलाचा समावेश करण्यात आला आहे. एका पिलरवर सहा लेन व खाली आठ लेन असणार आहेत. कराड-मलकापूरमधून जाणारा हा मार्ग 14 लेनचा असणार आहे. याचे काम किमान दोन वर्षे सुरू राहणार आहे.