सातारा | पुणे विभागात महाआवास अभियानात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागात सातारा जिल्हा परिषदेने तृतीय, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत द्वितीय क्रमांक पटकाविला असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे. विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण सोमवार दि. 30 रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्तांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे.
विभागस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीच्या बैठकीत पुरस्कार जाहीर करण्यात आला. सर्वोत्कृष्ट तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये पाटण तालुक्याने द्वितीय, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत तृतीय क्रमांक पटकाविला. शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना एकत्रितमध्ये पाटण तालुक्याने द्वितीय क्रमांक पटकाविल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांनी दिली.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प संचालक अविनाश फडतरे उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तर तालुक्यास्तरीयमध्येही पाटण तालुक्याने बाजी मारली आहे.