हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नागपूरमध्ये (Nagpur) औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून उसळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली आहे. आता येथे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला मोठा फौजफाटा तैनात करावा लागला आहे. आतापर्यंत या प्रकरणी ४६ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर कडाडून हल्लाबोल केला आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीसाठी सरकारला जबाबदार धरले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी या संपूर्ण प्रकरणावर मोठा दावा करत गंभीर आरोप केले आहेत.
“औरंगजेबाची कबर पुढची अयोध्या?”
प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका करत दावा केला की, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा भविष्यातील मोठा राजकीय अजेंडा बनवला जात आहे. “भाजपा-आरएसएस आगामी निवडणुकीसाठी हा मुद्दा उचलून धरणार आहेत. अयोध्येचा राजकीय फायदा संपला आहे, त्यामुळे आता औरंगजेबाची मजार दुसरी अयोध्या बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे.
तसेच, राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी बाहेरूनही लोक आणले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यासह “महाराष्ट्रात एका मोठ्या कटाचा भाग म्हणून अशांतता निर्माण केली जात आहे. राज्यातील जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता कायम ठेवावी,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
टाळी एका हाताने वाजत नाही
या सर्व प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी, दोन्ही गटांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, “टाळी एका हाताने वाजत नाही. जर राज्यात अशांतता निर्माण होत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, औरंगजेबाची मजार हा विषय राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे देखील त्यांनी भाष्य केले आहे.