काकांची निवृत्ती, पुतण्याला राजकीय वारसदार घोषित केलं; राष्ट्रवादीत मोठी घडामोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून (Ajit Pawar Group) एक मोठी बातमी समोर येत आहे. अजितदादा गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी (Prakash Solanke) यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. इथून पुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं म्हणत त्यांनी आपले पुतणे जयसिंह सोळंके यांचं नाव राजकीय वारसदार म्हणून जाहीर केलं आहे. भर निवडणुकीच्या तोंडावरच प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि नेते तयारीला लागले आहेत. नेत्यांकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. त्याचाच भाग म्हणजे माजलगावचे अजित पवार गटातील विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे 2024 च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गावांचे दौरे करत आहेत. यादरम्यान, एका गावात बोलताना त्यांनी आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. वयोमानानुसार आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच, आपल्या ऐवजी पुतणे जयसिंह सोळंके (Jaisingh Solanke) हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.

जयसिंह सोळंके कोण आहेत ?

जयसिंह सोळंके हे प्रकाश सोळंके यांचे कनिष्ठ बंधू धैर्यशील सोळंके यांचा मुलगा आहेत. म्हणजेच, प्रकाश सोळंके यांचे पुतणे. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच त्यांनी बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता हेच जयसिंह सोळंके प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्याला पाहायला मिळू शकतात. मात्र अजित पवार गट जयसिंह सोळंके यांच्या नावाला मान्यता देतो का ते आता पाहायला हवं.