हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हा शरद पवार आणि महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) माणूस आहे. मनोज जरंगेंच्या वक्तव्यांना मस्ती अन् माज नाही म्हणायचे, तर अजून काय म्हणायचे? मराठा समाजाला खड्ड्यात घालण्याचे काम मनोज जरांगे पाटलांनी केले त्यामुळे एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत अशा शब्दात प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
याबाबत प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक विडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं? विरोधात बोलणारं प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे, भाजपचा माणूस आहे म्हणतात. हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना (Maratha Community) खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत”, असे प्रसाद लाड म्हणाले.
मनोज जरंगेंच्या वक्तव्यांना मस्ती अन् माज नाही म्हणायचे, तर अजून काय म्हणायचे?
— Prasad Lad (@PrasadLadInd) September 8, 2024
मराठा समाजाला खड्ड्यात घालण्याचे काम मनोज जरांगे पाटलांनी केले…
मनोज जरांगे पाटील शरद पवार आणि मविआचा माणूस' आहेत आणि तसे नसेल तर त्यांनी चर्चेला यावे..! pic.twitter.com/wMKnu72rtZ
प्रसाद लाड पुढे म्हणाले, “मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळी प्रथम मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात २८८ उमेदवार उभे करा. राजा तुमच्यामागे आम्ही मराठे एक आहोत. ताकदीने उभे राहू. याचा ढोंगीपणा उघड करु, पवारांचं घातलेलं कातडं फाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असे म्हणत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.