जावळी | जावळी तालुक्यातील प्रति पंढरपूर करहर येथील आषाढीवारी कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा निर्बंधात असल्याने विठ्ठल भक्तांनी आपल्या घरी विठुरायाच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करून आषाढी एकादशी साजरी करावी. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचा आदर करीत हा सोहळा संपन्न करावा, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले
करहर येथे आगामी आषाढी एकादशी निमित्त झालेल्या आढावा बैठकीत आमदार भोसले बोलत होते. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रांताधिकारी राजेश टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी खराडे, तहसीलदार राजेंद्र पोळ, सभापती जयश्री गिरी, मेढा पोलीस निरीक्षक जीवन माने, वैदयकीय अधिकारी भगवान मोहिते, डॉ. अनंत वेलकर, सरपंच भाऊ यादव, मंडल अधिकारी विजय पाटणकर, ग्रामसेवक मंगेश शिंदे, ठाणे अंमलदार दत्तात्रय शिंदे, तसेच गावोगावचे वारकरी उपस्थित होते.
यावेळी वसंतराव मानकुमरे म्हणाले, आपण या महामारीत हक्काची माणसं गमावली आहेत. त्याकरिता गर्दी न करता प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून आपली धार्मिक परंपरा जपुया आषाढी वारी पुन्हा येईल माणसं पुन्हा मिळणार नाहीत. पांडुरंगावर श्रद्धा ठेवून उत्सव शांततेत पार पाडू.
प्रशासनाने वारकऱ्यांनी मागणी केलेल्या मानाची संत ज्ञानेश्वर व दत्तात्रय महाराज कळंबे या पालख्यांसाठी परवानगी देऊन त्या सोबतच्या चार वारकऱ्यांना कोरोना टेस्ट सक्तीची केली आहे. आढावा बैठकीस करहर पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचे भाविक उपस्थित होते. आढावा बैठकीचे प्रास्ताविक व आभार नितीन गावडे यांनी केले.
फेसबुक ऑनलाईन दर्शनाचा भक्तांनी लाभ घ्यावा
प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी एकादशचा सोहळा मंगळवार दि. 20 जुलै रोजी होणार नसला तरी पांडुरंगाचे दर्शन भक्तांना फेसबुकवर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तरी दर्शनाचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.