हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशांतर्गत क्रिकेट न खेळल्याने भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (BCCI) ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यावरून मोठा गदारोळ सुद्धा झाला. अनेक माजी क्रिकेटपटूंनी श्रेयश अय्यर आणि ईशान किशनची कानउघडणी केली, तर काही जणांनी बीसीसीआयवर निशाणा साधला. आता या वादात भारताचा माजी तेज गोलंदाज प्रवीण कुमारने (Praveen Kumar) उडी मारली असून थेट हार्दिक पंड्यावर (Hardik Pandya) निशाणा साधला आहे. हार्दिक पांड्या चंद्रावरून आलाय का?? असा सवाल करत प्रवीण कुमारने बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
एका यूट्यूब चॅनलवर बोलताना प्रवीण कुमारने हार्दिक पंड्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हार्दिक पांड्या काय चंद्रावरून खाली उतरला आहे का? त्याने सुद्धा देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे असं प्रवीण कुमारने म्हंटल. प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम का आहेत?? असा सवाल करत बीसीसीआयने हार्दिक पंड्याला सुद्धा ताकीद दिली पाहिजे अशी मागणी प्रवीण कुमारने केली आहे. तुम्ही फक्त देशांतर्गत टी-20 न खेळता तिन्ही फॉरमॅट मधील क्रिकेट खेळायला हवं असे मत प्रवीण कुमारने व्यक्त केलं.
जर बीसीसीआयला वाटत असेल कि हार्दिक पंड्या टी-२० मधील आपला मुख्य खेळाडू असून त्याच्या फिटनेस वर कोणताही परिणाम व्हायला नको तर त्याला स्पष्टपणे सांगून टाका कि तुझी निवड कसोटी संघात होणार नाही. तू फक्त टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळ… असं सांगितल्यावर खेळाडूंच्या मनाचेही समाधान होईल असं प्रवीण कुमार म्हणाला
दरम्यान, विश्वचषक २०२३ पासून हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. वर्ल्डकप मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. आता तो फिट असून इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या तयारीला लागला आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये हार्दिक मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल. रोहित शर्माच्या जागी मुंबईने हार्दिकला कर्णधार केलं आहे.