हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा प्रयागराजमध्ये पार पडणार असून , या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. 2025 च्या मेळावात उत्तर प्रदेश सरकारने भाविकांच्या आरोग्य सुविधांवर अधिक भर दिलेला आहे. त्यासाठी विविध योजनांची आखणी केली जात आहे . जेणेकरून यात्रेकरूना येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर मात करता येईल. या आखणीमध्ये आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी स्वतः याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यंदाच्या महाकुंभासाठी सुमारे 40 कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे.
आरोग्याच्या झटपट सेवेसाठी 6000 खाटांची व्यवस्था
महाकुंभच्या काळात 6000 खाटांची व्यवस्था केली जात आहे. त्यापैकी 360 खाटा मेला स्थळावर असतील. तसेच अरेत व झुसी येथे प्रत्येकी 25 खाटांचे दोन नवीन रुग्णालये उभारली जातील. सरकारी रुग्णालयांमध्ये 3000 खाटांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे आणि गरज पडल्यास खाजगी रुग्णालयांमधूनही तितक्याच खाटांची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे लोकांना झटपट सेवा प्रदान होणार आहेत.
टेली आयसीयू सुविधा
भाविकांच्या देखभालीसाठी टेली आयसीयू सुविधा सुरू केली जाणार आहे. तसेच मेला स्थळावर 125 अँब्युलन्स आणि सात रिव्हर अँब्युलन्स 24×7 तैनात राहतील. त्याचसोबत रुग्णालय व्यवस्थापकांची नेमणूक केली जात आहे, जे रुग्णांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असतील. तसेच नेत्र कुंभच्या माध्यमातून तीन लाख गरजू भाविकांना मोफत चष्मे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय प्रत्येक सेक्टरमध्ये वैद्यकीय मदत केंद्रे उभारली जात आहेत. रुग्णालयांमध्ये महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.
15 डिसेंबरपासून प्रशिक्षण
15 डिसेंबरपासून आपत्ती व्यवस्थापनासाठी मॉक ड्रिल सुरू होणार आहे. तसेच डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफला नरोरा येथील अणुऊर्जा केंद्रात केमिकल, बायोलॉजिकल, रेडियोलॉजिकल, न्यूक्लियर आणि एक्सप्लोसिव्ह (CBIRNE) धोक्यांना सामोरे जाण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाकुंभ मेळ्यादरम्यान भाविकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे, म्हणून यासाठी सर्व संबंधित विभाग एकत्र काम करत आहेत.