गर्भवती महिलेसोबत डॉक्टरचे ‘हे’ घृणास्पद कृत्य; तपासणीसाठी नेले अन्…

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ याठिकाणी वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका डॉक्टरने त्याच्याकडे तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेसोबत लैंगिक चाळे केले. यानंतर पीडित महिलेने याची माहिती आपल्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण ?
गणेश बंडेवार असे गुन्हा दाखल झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 24 वर्षीय पीडित महिला चार महिन्यांची गरोदर होती. शनिवारी अचानक तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ती रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आपल्या एका नातेवाईकाला घेऊन, औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. या ठिकाणी गेल्यानंतर पीडित महिलेने रुग्णालयातील एका परिचारिकेला होणारा त्रास सांगितला.

यानंतर संबंधित परिचारिकेनं पीडितेच्या पोटात दुखत असल्याची माहिती आरोपी वैद्यकीय अधिकारी गणेश बंडेवार याला दिली. त्यानंतर आरोपी बंडेवार याने तपासणी करण्यासाठी पीडित महिलेला प्रसूतीगृहात नेले. याठिकाणी आरोपीने तपासणी करण्याच्या बहाण्याने पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. यानंतर घाबरलेल्या महिलेने आपल्यासोबत असलेल्या नातेवाईकाला याची माहिती दिली. त्यानंतर पीडित महिलेच्या नातेवाईकानं थेट औंढा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित डॉक्टरच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. औंढा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.