कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमालीचा उकाडा जाणवत होता. मात्र, जिल्ह्यातील पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पुन्हा पावसाने आपली हजेरी लावली आहे. रिमझिम स्वरूपात पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण होऊ लागला आहे. दरम्यान बुधवारी सातारा जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी कराड, पाटण तालुक्यातील काही भागांना पावसाने झोडपून काढले.
बुधवारी पावसाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी हजेरी तर लावलीच शिवाय कोयना धरण क्षेत्रातही प्रथमच आवक होऊ लागली आहे. बुधवारी जिल्ह्याच्या पूर्व भागाकडील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते. सातारा जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी लागते. यंदाही पावसाने वेळेपूर्वीच अगोदरच हजेरी लावली आहे. मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात पावसाने जोरदारपणे सुरूवात केली आहे. कोयना धरण क्षेत्रात चांगल्याप्रकारे पावसाने हजेरी लावली असल्यामुळे धरण परिसरात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील सातारा शहरासह तालुक्यात मंगळवारी व बुधवारीही पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे सर्वाधिक ५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे काहीशी नोंदही झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९२ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर कण्हेरला ३१ तर एकूण ८९ मिलीमीटर पाऊस झाला. धोमला १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जूनपासून धोम धरण परिसरात ७२ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. बलकवडीला बुधवारी सकाळपर्यंत ३६ मिलीमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत १०१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर तारळीला २५ आणि जूनपासून ९५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.