सातारा | मांडवे (ता. सातारा) येथील प्रवीण अशोक पवार या सुपुत्रास जीवनरक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपतींकडून या पुरस्काराची घोषणा केली आहे. दुबई-कोझिकोड विमानाच्या अपघातावेळी मदतकार्यात शौर्याची प्रचिती देणाऱ्या सातारच्या सुपुत्राचा गाैरव होणार आहे.
प्रवीण पवार हे सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. 7 ऑगस्ट 2020 मध्ये दुबईहून कोझिकोडला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या विमानातून 191 प्रवासी प्रवास करत होते. जोरदार पाऊस अन् प्रतिकूल हवामामुळे हे विमान कोझिकोडनजीकच्या दुर्गम भागात कोसळले होते. यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवीण पवार यांनी मोठ्या साहसाने अपघातातील जखमींना वाचविले होते.
या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जीवनरक्षक पुरस्कारांची घोषणा केली. त्यात देशभरातून 29 जणांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यात पवार यांचा समावेश आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.