आटपाडी येथील सुहास भंडारे यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | आटपाडीचे सुपुत्र एअर कमोडोर सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाई दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपतींनी विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते. दिल्ली येथे हवाईदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताच्या तिन्ही दलांचे प्रमुख बिपीन रावत यांच्या उपस्थितीत भारतीय हवाईदल प्रमुख वी. आर. चौधरी यांच्या हस्ते हे विशिष्ठ सेवा पदक एअर कमोडोर सुहास भंडारे यांना प्रदान करून गौरविण्यात आले.

आटपाडी येथील पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्स,टाइम्स ऑफ इंडियाचे एजंट प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र, पत्रकार प्रशांत भंडारे यांचे जेष्ठ बंधू एअर कमोडोर सुहास भंडारे यांनी आपल्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुहास भंडारे यांना विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते.

हवाईदल प्रमुख वी.आर.चौधरी यांच्या हस्ते सुहास भंडारे यांना हे विशिष्ठ सेवा पदक देऊन सन्मानित केले. माणदेशातील आटपाडी या छोट्याशा तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाईदलात मिळालेल्या संधीचे चीज केले आहे. नियुक्ती झालेल्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. पुणे येथील सेव्हन टेट्रा स्कुलच्या प्राचार्यपदी आणि पुणे येथील एअरफोर्स तळावर नाईन बी. आर. डी. चे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या ते दिल्ली येथे सेवा बजावत आहेत.

Leave a Comment