विशेष प्रतिनिधी । परतीच्या पावसाचा कृषिमाल उत्पादनाला चांगलाच फटका बसला आहे. परिणामी बाजारात भाजीपाल्याची अवाक कमी झाल्याने भाज्यांचे भाव वाढले असतांना आता डाळींच्या भावात सुद्धा वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसह राज्यातील इतर भागात देखील किरकोळ बाजारांत ओल्या दुष्काळाच्या नावाने ग्राहकांची लूट सुरू असल्याचे समोर आले आहे.
गेल्या महिनाभरापासून कांद्याचे वाढलेले दर अजूनही आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्हे नसून, किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा कांदा किलो मागे ७५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. इतर भाज्यांच्या दरातही पाच ते दहा रुपयांची वाढ झाली असून डाळीही शंभरीपार गेल्या आहेत.
मुंबई, ठाणे परिसरांत पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ांमधून मोठय़ा प्रमाणावर कृषिमालाची आवक होते. पावसाळा संपताच साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून शहरी भागास कृषिमालाचा पुरवठा होतो. त्यामुळे दिवाळीनंतरचा काळ एरव्ही कृषिमालाच्या स्वस्ताईसाठी ओळखला जातो. यंदा मात्र राज्यातील अवकाळी पावसामुळे हे गणित पूर्णपणे बदलले आहे.दरम्यान अजून काही दिवसं पावसाची शकयता असल्याने भाज्यांचे दर आणखी चढे राहण्याची शक्यता आहे.