पुणेकरांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एवढेच नव्हे तर गणेशोत्सव काळात सुद्धा पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. असे असताना पुणे मेट्रोच्या नवीन भूमिगत मेट्रोचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 सप्टेंबर रोजी करणार आहेत. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड ते निगडीपर्यंत उन्नत कॉरिडॉरची पायाभरणी
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या मार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच सुरू होईल, आणि आम्ही हा संपूर्ण रस्ता पूर्ण करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गासाठी इतके निर्णय घेतले याचा मला आनंद आणि सन्मान वाटतो,” असे ते म्हणाले. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो कॉरिडॉरचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा विस्तार करण्यासाठी आणि पिंपरी चिंचवड ते निगडीपर्यंत उन्नत कॉरिडॉरची पायाभरणीही ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही पुणे मेट्रोसाठी नवीन टप्पे बांधत आहोत. गणपती उत्सवात विसर्जनासाठी तब्बल 3.5 लाख लोकांनी मेट्रोने प्रवास केला. पंतप्रधान मोदी मेट्रोच्या नवीन मार्गाचे उद्घाटन करतील आणि 26 सप्टेंबर रोजी दुसऱ्या मार्गाचे ‘भूमिपूजन’ करणार आहेत. तर येत्या काही दिवसांत पुणे हे सर्वोत्तम शहरी निवास केंद्रांपैकी एक होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याबाबतचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठविण्यात येणार असून, मोहोळ व गडकरी साहेब त्याचा पाठपुरावा करणार आहेत.