हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काहीही झालं तरी सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha 2024) आम्ही भाजपला घुसू देणार नाही, महाविकास आघाडी साताऱ्याची जागा पूर्ण ताकदीने लढेल असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपला आव्हान दिले आहे. काँग्रेसच्या कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी वरील विधान केलं. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस कडे आहे. साताऱ्यात सक्षम उमेदवार देण्याचे काम त्यांच्याकडून सुरु आहे. लवकरच ते उमेदवाराची घोषणा करतील. परंतु एक गोष्ट नक्की कि सातारा मध्ये आम्ही भाजपला घुसू देणार नाही हा आमचा निर्धार आहे. साताऱ्याची जागा आत्तापर्यंत कधीही जातीयवादी विचाराकडे गेली नाही आणि हीच परंपरा आम्हाला कायम ठेवायची आहे. त्यासाठी महाविकास आघाडीमध्ये आम्ही सातारा लोकसभा मतदारसंघ पूर्ण ताकदीने लढवणार आहोत असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.
दरम्यान, निवडणूक तारीख जाहीर होऊनही महविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून सातारा लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल याबाबत नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. महाविकास आघाडीमध्ये साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार हे तर नक्क्की आहे, त्यासाठी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, त्यांचे पुत्र सारंग पाटील आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये साताऱ्याची जागा भाजप लढवणार कि अजित पवार लढवणार हेच अजून ठरलेलं नाही. भाजपने सातारा लोकसभा निवडणूक लढवली तर उदयनराजे भोसले हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे तर अजित पवार गटाकडे हि जागा गेल्यास जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील याना तिकीट मिळू शकते