हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणातून निवृत्त होऊन देशाच्या राजकारणात मला जायला आवडेल अशी इच्छा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. हॅलो महाराष्ट्राच्या विशेष पॉडकास्ट मध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देशातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना सध्याच्या राजकीय परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात काम करायला आवडेल कि दिल्लीच्या राजकारणात याबाबतही त्यांनी त्यांच्या मन कि बात बोलून दाखवली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्याच्या राजकारणातून निवृत्त होऊन देशाच्या राजकारणात मला जायला आवडेल. मी बौद्धिकरित्या सक्रिय असणार आहे. माझं कराडशी नातं आहे. मी कराड मध्ये आहे. काँग्रेस म्हणून आम्ही येथील निवडणूका लढवणार आहोत. मात्र माझं बौद्धिक काम हे राष्ट्रीय पातळीवरचे असेल . गांधी कुटुंबात सर्व काँग्रेस पक्षाला एकत्र ठेवण्याची ताकद आहे. राहुल गांधींना लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांची स्टाईल ऑफ लीडरशिप वेगळी आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्राच्या पॉडकास्ट मध्ये बोलताना व्यक्त केले.
भाजपने बोगस मतांच्या आधारे विजय मिळवला –
दरम्यान, निवडणूक आयुक्तांची निवड प्रक्रियाच मोदींनी पारदर्शक न ठेवल्याने हि व्यवस्था निपक्षपाती राहिलेली नाही असा आरोप करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक चोरली का? या राहुल गांधी यांच्या लेखातील मुख्य मुद्दा समजून सांगितला. मागील ५ वर्षात ३१ लाख मतदार वाढले म्हणजे दर महिन्याला ५० हजार नवीन मतदार नोंदणी झाली. मात्र लोकसभा ते विधानसभा या ५ महिन्यांत ४१ लाख म्हणजे महिन्याला ९ लाख मते मते वाढली. भाजपने बोगस मतदान करून टार्गेट करून काही लोकांचा पराभव केला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, EVM मशीनवर लोकांचा विश्वास नाही. जगातल्या लोकशाही देशांमध्ये सर्व प्रगत देश बेलेट पेपरचा वापर करत आहेत. जर्मन न्यायालयात EVM मशीनने निवडणूक घेणे हे बेकायदेशीर आहे असा निकाल लागला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड घोटाळा हेराफेरी झाली आहे. निवडणूक प्रक्रियेत काही चांगले बदल झाले पाहिजेत कारण लोकांचा शेवटी निवडणूक प्रक्रियेवर विश्वास बसला पाहिजे अशी आमची भूमिका आहे असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्रला दिलेल्या पॉडकास्ट मध्ये केले.