पुणे- बंगळूर महामार्गावर ‘द बर्निंग बस’चा थरार; 35 प्रवासी सुखरूप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पुणे- बंगळूर महामार्गावर मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सला चंग आग लागली. ट्रॅव्हलच्या पाठीमागील चाकाचा ब्रेक ड्रम गरम झाल्यामुळे टायर फुटून ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून बसमधील 35 प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, संबंधित बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबईहून कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीकडे जाणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आज सकाळी सातारा बाजूकडून तासवडे टोल नाका परिसरात आली. ट्रॅव्हल्समधून सुमारे ४० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांचे साहित्य व अन्य साहित्यही बसमध्ये ठेवण्यात आले होते. बस महामार्गावरून जात असताना त्यातील पाठीमागील चाकाचा ब्रेक ड्रम गरम होऊन टायर अचानक फुटला. त्यानंतर ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना काही समजण्यापूर्वीच ट्रॅव्हल्सने पेट घेतला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1196497677633659

महामार्गावरच घडलेल्या या प्रकारामुळे बघ्यांची चांगलीच गर्दी जमली. यावेळी काही लोकांनी याबाबतची माहिती महामार्ग देखभाल विभागातील कर्मचाऱ्यांना दिली. महामार्ग देखभाल विभागातील कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग डिझेल टाकीपर्यंत जाण्यापूर्वीच विझवण्यात अग्निशमन दलास यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीमुळे महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, तळबीड पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.