गुण वाढले, पण गुणवत्तेचं काय ? – राजेंन्द्र मोहिते

Thumbnail 1533018784578
Thumbnail 1533018784578
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नमस्कार, मी राजेंद्र मोहिते, १२ वी अकाउंटन्सी चे क्लासेस घेतो. तेही ग्रामीण भागात. पोरं प्राज्ञ भाषेत गावंढळ म्हणावी अशीच. पुढच्या वर्षी क्लासचा रौप्यमहोत्सव होईल. माझे विद्यार्थी अनेक उच्च पदांवर काम करताहेत. दोन, तीन सीए आहेत, काही मोठमोठ्या कंपन्यांत आहेत, उद्योगांत वेगवेगळ्या क्षेत्रांत आहेत, देशाच्या सीमेवर आणि सीमेपलीकडेही आहेत. मी पोरांवर (पोरं म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी) संस्कार करण्याचा माझ्या वकुबाप्रमाणे प्रयत्न केला, तो थोडाबहुत का होईना, पण यशस्वी झाल्याचं समाधान आज, मला मिळतंय खरं, पण पुढे मिळेल अशी गॅरंटी वाटत नाही.

पूर्वी साधी, फाटक्या फाटक्या पँटांतील मुलांची आणि सध्या सलवार कमीजच्या मुला-मुलींची जागा आता हाफ मॅनेला वुईथ जीन्स (दोघांनीही) घेतलीय. पूर्वी चालत किंवा सायकलवरून येणारी ही पोरं आता गाड्या ‘उडवत’ कलासवर येतात. (पूर्वीच्या शिकवणीची जागा आता क्लासनं घेतलीय म्हणा!) पिशव्यांची जागा आता ‘सॅक’ नी घेतलीय, डबा आता ‘टिफिन’झालाय, भाजी भाकरीच्या जाग्यावर आता नूडल्स आहेत. टाईमपास आठ आण्याच्या फुटण्याऐवजी एअरपॅक्ड कुरकुरे आलेत. पण ९ चा पाढा येत नाही, हेही तितकंच खरं. हातात असलेल्या फोनला ‘अँड्रॉईड पीस’ म्हणायचं हे त्यांना कळतं खरं पण त्या दोन्ही शब्दाचं स्पेल्लिंग नीट लिहिता येत नाही त्याला आपण काय म्हणणार, प्रगती की अधोगती?

मी फार जुन्या काळात जात नाही.पण माझे आई वडील दिडकी, पावकी चा पाढा सहज म्हणून दाखवायचे, अर्थात तो त्यांच्याएवढा मला येत नव्हता नव्हता आणि नाहीही. कारण ‘बीजगणित’ नावाचं भूत आमच्या मानगुटीवर कायम बसलेलं असायचं. (a+b) square = means what? उत्तर पुस्तकातील बघून लिहायचो खरा, पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग फक्त ‘डिग्री मिळून नोकरी आणि छोकरी’ साठी होतो, हा शोध खूप उशीरा (!) लागला. तीच गोष्ट भाषेची, संस्कृत बापजन्मात जमलं नाही, पुस्तकातल्या हिंदीपेक्षा सिनेमातली हिंदी जास्त कळायची. आपली वाटायची, अजूनही वाटते. इतिहास आवडायचा खरा पण त्यातल्या सनावळ्या पाठ करता करता गड किल्ले चढण्याइतकी दमछाक व्हायची. त्यातच इंग्रजीचं व्याकरण डोस्क्यावर बसलं पण डोक्यात काही गेलं नाही आणि भूमितीच्या बाबतीत तर वाटोळंच! पण आज बाजारात गेलं की कोणती वस्तू कितीला घ्यायची हे ग्यान माझ्या आईबापाने दिलं. आज हे ‘knowledge’ माझी मुलं त्यांच्या मम्मी पप्पांकडून घेऊ शकतात का?

मूळ प्रश्न असा आहे की ती बाजारात जातात का? ते तर बझारमध्ये जातात! तिथं सगळंच लेबल्ड (आणि या जंजाळात मी पप्पा आणि बायको मम्मी ) कधी झालो हे कळलंच नाही. माझा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकतो. मोठ्या दोन्ही मुली मराठी माध्यमातून शिकल्या. तर इंग्लीश मिडीयमचा मुलगा ज्यावेळी ९ वी चा निकाल लागून १० वीत गेला (दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट) त्यावेळी कराडातील कलासवाल्यांचे फोन सुरू झाले.

अशाच एका ‘सरांनी’ मला फोन केला..

क्लासचे सर – अश्वमेध चे पप्पा का?

मी – होय, आपण कोण?

क्लासचे सर – मी xxxx कलासमधून बोलतोय ,xxxx सर

मी – हां बोला.

क्लासचे सर – अहो तुमचा मुलगा खुप छान आहे, तो दहावीत जाणार आहे, नववीला चांगले मार्क्स आहेत. अबाव 90%. त्याला थोडं मार्गदर्शन करायचं होतं.

मी – बरं. काय मार्गदर्शन करायचं आहे ?

क्लासचे सर – आम्ही कौन्सिलिंग घेतो, तुमचा मुलगा पुढे स्टार होईल, आमच्या fees नाममात्र आहेत. एकदा पाठवून तरी बघा.

मी – सर धन्यवाद. फक्त मला एक सांगा तुम्ही बाजारात गेला आणि कोबीचा दर ५ रूपये किलो असेल तर तीन पावशेरचे किती द्याल तुम्ही?

क्लासचे सर – अहो हा काय प्रश्न आहे?

मी – मग सांगा ना?

क्लासचे सर – थांबा. (please wait)… (फोन कट होतो)

आजपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही.

मग मला प्रकर्षाने प्रश्न पडतो की माझ्या पोरांची किंमत काय? लेबल्ड बझारची की रोकड्या बाजारची?

पोरगं बाजारात जायला पाहिजे…दुनियेच्या ओपन मार्केटमध्ये. तरच त्याला त्याची खरी किंमत (म्हणजे त्यानं स्वतःची लावलेली, त्याला लागलेली आणि लादलेली नव्हे!) कळेल. असं वाटायला लागलं. आणि तेच खरं आहे.

राजेंन्द्र मोहीते
(लेखक कराड तालुक्यामधील रेठरे गावात अकांउंटचे क्लासेस घेतात)