नवी दिल्ली । कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता आणखी शिगेला पोहोचला आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात पाचवी बैठक सुरू आहे. या बैठकीतही सरकार आणि शेतकरी आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशात शेतकऱ्यांनी “आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात काय ते उत्तर द्या”, अशी भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसमोर कृषी कायद्यातील संशोधनाबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सरकारचा हा संशोधनाबाबतचा प्रस्ताव देखील साफ फेटाळून लावला आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या भूमिकेवर शेतकरी नेते ठाम आहेत.
“आतापर्यंत खूप चर्चा झाली. आम्हाला आता सरकारसोबत कोणतीही बैठक नको, लेखी स्वरुपात उत्तर हवंय.”, अशी भूमिका शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घेतली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात गेल्या तीन तासांपासून अधिक काळ सुरू असलेल्या या बैठकीत केंद्र सरकारकडून कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल, तर शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकरी संघटनांचे एकूण ४० प्रतिनिधी उपस्थित आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारसोबतच्या या बैठकीआधीच शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या ८ डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची घोषणा केलेली आहे. याशिवाय, आज सरकारने कायदे रद्द करण्याची भूमिका घेतली नाही, तर देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळले जातील असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबतची आजची बैठकी होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, गृहमंत्री अमित शहा, रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीनंतर नरेंद्रसिंह तोमर आणि पियूष गोयल हे सरकारच्यावतीनं शेतकरी संघटनांसोबत चर्चा करण्यासाठी विज्ञान भवनात दाखल झाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’