हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता, मात्र मुंबई हायकोर्टाने या बंदला परवानगी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीकडून आज निषेध आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहे. आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुद्धा निषेध आंदोलन केलं आहे. पुणे स्टेशन परिसरात शरद पवार गटाचे आंदोलन सुरु आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत हे निषेध आंदोलन चालणार आहे.
शरद पवार यांनी या आंदोलनादरम्यान हाताला काळी फीत आणि तोंडाला काळा मास्क लावला असल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अनेक कार्यकर्ते याठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे. स्टेशन रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे निषेध आंदोलन सुरु आहे. अगदी शांततेत ते निषेध आंदोलन सुरु आहे.
शरद पवार यांच्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा निषेध आंदोलनात सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे हे ११ वाजता दादर येथील शिवसेना भवनासमोर आंदोलन करतील. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन परिसरात काळ्या रंगाचा स्टेज बांधण्यात आला आहे. तसेच मोठी बॅनरबाजीही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाना पटोले हे ठाण्यात निषेध आंदोलन करतील. महाविकास आघाडीचे नेते पहिल्यांदाच अशाप्रकारे संयुक्त आंदोलन करत आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.