औरंगाबाद – शहरातील वेगवान गोलंदाज कार्तिक संजीव बालय्या याची निवड 19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी झाली आहे. कार्तिक आता नवी दिल्ली येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील राष्ट्रीय विनू मांकड क्रिकेट स्पर्धेत आपले कौशल्य आजमावेल. ही स्पर्धा 28 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत कार्तिक महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करेल. याही स्पर्धेत कार्तिक आपले कौशल्य पणाला लावून, औरंगाबाद तसेच महाराष्ट्र संघाचे नाव उंचावेल, आशा औरंगाबाद क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे. तसेच कार्तिकच्या या भरारी बद्दल सर्व शहरवासीयांना अभिमान वाटत आहे असे देखील क्रिकेटप्रेमींनी सांगितले आहे.
कार्तिककडे आऊटस्विंगचे अस्त्र
19 वर्षाखालील गटात विनू मांकड क्रिकेट स्पर्धेसासाठी कार्तिकची महाराष्ट्र संघात प्रथमच निवड झाली आहे. यापूर्वीही सोळा वयोगटात असताना कार्तिकने दोन राज्य स्पर्धेत सहभाग नोंदवला असू चार स्पर्धांमध्ये त्याने एकूण नऊ विकेट्स पटकावल्या. सहा फूट दोन इंच उंचाचा कार्तिक बालय्या हा उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. कार्तिक हा 125 ते 130 वेगाने गोलंदाजी करू शकतो. आऊट स्विंग हे त्याचे खास अस्त्र असल्याची माहिती त्याच्या प्रशिक्षकांनी दिली.
वडिलांच्या तालिमीत घडला कार्तिक
कार्तिकडे वडील संजीव बालय्या हे स्वतः उत्तम क्रिकेट पटू आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच कार्तिकला क्रिकेटचे बाळकडू मिळाले. तिसरी-चौथीत असल्यापासूनच कार्तिकने जिद्दीने आणि एक ध्येय ठेवत क्रिकेटचा सराव सुरु केला. संजीव बालय्या यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा खेळ सुधारत गेला. नंतर संदीप दहाड, अविनाश आवारे, शेख फिरोज यांचे त्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. एमआयटी महाविद्यालयाच्या क्रिकेट मैदानावर कार्तिकला सरावाची संधीही देण्यात आली. या सरावावेळी एआयटीचे महासंचालक मुनीष शर्मा, क्रीडा विभाग प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांचीही मदत झाली.
राष्ट्रीय पातळीवर कौशल्य आजमावणार
महाराष्ट्र राज्याच्या संघात प्रथमच कार्तिक बालय्याची निवड झाली आहे. ”राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळण्याची ही संधी मिळण्यासाठी आतापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. तसेच माझ्यातील कौशल्य वृद्धीसाठी वडिलांसह औरंगाबादमधील अनेक मार्गदर्शकांनी वेळोवेळी महत्त्वाचा पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मी इथवर येऊ शकलो. आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघाकडून खेळताना आणखी जिद्द आणि मेहनतीने खेळ दाखवेन,” अशी प्रतिक्रिया कार्तिंक बालय्या याने व्यक्त केली.