बाधित भागातील ग्रामस्थांना तत्काळ सर्व सोयी सुविधा द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

0
38
collector
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील सात मंडळांमध्ये मोठ्याप्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या बाबी, सोयी सुविधा तत्काळ दुरुस्त कराव्यात, आवश्यक त्या ठिकाणी नवीन बाबींचा समावेश करावा. बाधित झालेल्या भागातील नागरिकांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना कराव्यात, ग्रामस्थांना सोयी सुविधा तत्काळ द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक कन्नड येथील गजानन हेरिटेजमध्ये जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार उदयसिंह राजपूत, उप विभागीय अधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, तहसीलदार संजय वारकड, सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

आमदार राजपूत यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना करताना नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर देण्याच्या सूचना केल्या. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी वस्तूनिष्ठपणे पंचनामे करावेत. सर्व यंत्रणांनी नुकसान झालेल्या गावात चांगल्याप्रकारे सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, भिलदरी धरण फुटल्याने अनेकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. अशी घटना पुन्हा होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. परिसरातील पाझर तलाव स्वच्छ करावेत. त्यासाठी जिल्हा विकास निधी योजनेतून निधी देण्यात येईल. तालुक्यातील नदी पात्रामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राचे रेखांकन करावे. लाल, निळया पूर रेषा आखाव्यात, असे निर्देश जलसंपदा विभागास दिले. नदी पात्रात असलेले अनधिकृत बांधकाम हटवावेत, असेही ते म्हणाले.

अतिवृष्टीने शासकीय इमारती, स्मशानभूमी शेड, पूल,रस्त्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहेत, या रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण करावीत. भिलदरी धरण फुटल्याने पाण्याची समस्या ग्रामस्थांना झाली. त्याचप्रमाणे सायगव्हान, भिलदरी, नागद, हसनाबाद आदींसह परिसरातील सर्व गावात पाणी पुरवठा सुरळीत करावा, आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे पाणी पुरवठा विभागास सांगितले. खाली पडलेल्या वीज तारा, पडलेले खांब उभारावेत. नवीन आवश्यक बाबींसाठी जिल्हा विकास निधीतून निधी देण्यात येईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
सार्वजनिक नुकसानीचा आढावा –
जलसंधारण, जलसंपदा, राज्य रस्ते महामार्ग, वन, जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, महावितरण, कृषी, बीएसएनएल आदी विभागाच्या सार्वजनिक नुकसानीचा आढावाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी घेतला.

बाधितांना सहायक अनुदान –
अतिवृष्टीने घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या विशाल खैरे, गौतम हिवरे, उमेश पाठक, शांताबाई राजपूत, प्रकाश प्रजापती या बाधितांना प्रातिनिधिक स्वरूपात शासनाकडून सहायक अनुदानाचे धनादेश आमदार राजपूत, जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

शेती, पशुधनाबाबत सूचना –
पुरामुळे दगावलेल्या जनावरांचे शवविच्छेदन अहवाल तत्काळ द्या. खरडून गेलेल्या शेतीसह पिकांचे नुकसान, वस्तूनिष्ठ पंचनामे करणे, नुकसानग्रस्त, बाधितांना मदत देण्याबाबतही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सूचना केल्या. उपविभागीय अधिकारी विधाते यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here