जावली | जावली तालुक्यात पर्जन्यमान जास्त होवून देखील जावलीतील आई- भगिनींच्या डोक्यावर हंडा नेहमी राहीलेला असलेला पहायला मिळत आहे. तांत्रिक चुकांमुळे फक्त वीज बील भरुन जावलीतील 14 ग्रामपंचायतींना नाहक भुर्दंड बसत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्याकरीता विधानपरीषद आमदार शशिकांत शिंदे यांनी जलजीवन मिशनच्या रेट्रोफिटींगच्या माध्यमातून खास बाब म्हणून जावलीतील 14 गावांच्या नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर कराव्यात, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी पत्राद्वारे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील याच्याकडे केलेली आहे.
जावली तालुक्यांतील केळघर विभागातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाजीराव चौधरी, आतिश कदम, दिपक मोरे, आकाश कोढाळकर यांनी जावलीतील 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आ. शशिकांत शिंदे याच्यांशी वाशी (मुंबई) येथे चर्चा केली. आ. शशिकांत शिंदे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, सातारा मतदार संघातील जावली तालुक्यातील करंजे प्रादेशिक योजनेतील गाढवली, वाळजवाडी, मामुर्डी, तळोशी, केळघर, बोडांरवाडी, केडांबे, वागदरे, डागरेघर, मोहाट, म्हाते खुर्द, गांजे, गवडी, म्हाते बुद्रुक या गावाच्या पाणीपुरवठा योजना करंजे प्रादेशिक मधून झाल्या आहेत. 14 ते 15 वर्षांपूर्वी योजना झाल्याने त्या सर्व योजना नादुरुस्त व बंद आहेत.
दुर्गम डोंगराळ जावळी तालुक्यातील कष्टकरी जनतेला प्रादेशिक योजना बंद असल्यामुळे पाण्याची चणचण सदैव भेडसावत आहे. उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे जावलीतील 14 गावांना स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना अत्यंत गरजेची आहे. तरी जावलीतील 14 गावांना खास बाब म्हणून जलजीवन मिशनच्या रेट्रोफिटींगच्या योजने अंतर्गत पाणीपुरवठा विभाग सचिव महाराष्ट्र राज्य यांना आपण योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी केली आहे .




