औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी एक हजार रुपयांची तरतूद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या विकासासाठी अवघ्या 1 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे रेल्वे स्टेशनचा दुसरा टप्पा यंदाही रखडण्याची स्थिती आहे. परंतु मराठवाडा आणि विदर्भ भागादरम्यान वेगवान कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करून विकास मार्गाला नेण्याची क्षमता असलेल्या नांदेड-वर्धा (यवतमाळमार्गे) रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 820 कोटी 47 लाख रुपयांच्या निधीची तरतूद झाली आहे.

तर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी 567 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला. याबरोबर सध्या सुरू असलेल्या मराठवाड्यातील इतर रेल्वे प्रकल्पांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, नवे प्रकल्प सध्या ‘वेटिंग’वरच असल्याची स्थिती आहे.

नांदेड-वर्धा रेल्वे मार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये दळणवळणाचा संपर्क वाढण्यास मदत होणार आहे. या रेल्वे मार्गासाठी 820 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाल्याने हा मार्ग गतीने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या 25 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या परळी-बीड-अहमदनगर या 261 कि.मी. रेल्वेमार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. 261 कि.मी.पैकी सध्या 66 कि.मी म्हणजे अहमदनगर ते आष्टी हे काम पूर्ण झाले आहे. या मार्गासाठी 2022-23 या वर्षासाठी 567 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे.

तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वे ट्रॅकवर आणण्याचे मागणी 1960 पासून सुरू आहे. 2004-05 या वर्षात सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली. सर्वेक्षणानुसार हा मार्ग 84 किमीचा आहे. त्यासाठी 15 वर्षांपूर्वी 189 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. दरम्यान, पाठपुरावा थंडावला. त्यामुळे चर्चाच झाली नाही. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापुरात घेतलेल्या सभेत हा मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मोदींच्या मागील टर्मच्या शेवटच्या टप्प्यात या मार्गाच्या पुनर्सर्वेक्षणास मंजुरी मिळाली. पुन्हा सर्व्हे झाला तेव्हा हा प्रकल्प खर्च 904 कोटींवर गेला. आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी 10 कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे.

Leave a Comment