पुणे | समिर रानडे
‘दाजीकाका सतत कामात असत पण जेव्हा कामात नसत तेव्हा लोकात असत. कायम लोकांशी संवाद साधत ते प्रत्येकाला आपलेसे करायचे. हीच लोक संपर्काची कला एकविसाव्या शतकात यशाची गुरुकिल्ली आहे’ असे मत सिंबायोसिस चे संस्थापक डॉ एस बी मुजुमदार यांनी व्यक्त केले. पीएनजी ज्वेलर्सच्या थिंक प्युअर सोशल वेलफेअर फौंडेशन द्वारा टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते.
स्वर्गीय दाजीकाका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या 104 व्या जयंतीचे औचित्य साधून थिंक प्युअर अॅवॉर्डस सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ.एस.बी.मुजूमदार,कायनेटिक उद्योगसमुहाचे अध्यक्ष अरूण फिरोदिया, पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, कार्यकारी संचालक पराग गाडगीळ व संचालक विद्याधर गाडगीळ उपस्थित होते. यावेळी डॉ.मुजुमदार यांनी दाजीकाकांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी बोलताना अरूण फिरोदिया म्हणाले की, पु.ना.गाडगीळचे जरी पीएनजी ज्वेलर्स मध्ये रूपांतर झाले असले तरी आमच्यासाठी ते पुण्यातील नामवंत गाडगीळ ज्वेलर्स असे आहे.कारण एक शतकाहून अधिक काळ सचोटीने काम करत त्यांनी सोन्याला झळाळी दिली आहे. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की सकारात्मकता,कामातील रुची आणि बदलांशी सुसंगत राहणे ही दाजीकाकांमधील वैशिष्टये होती. मनात शुध्दता असेल तर यश नक्की मिळेल हे दाजीकाका म्हणत.त्यांच्या ह्या गुणांनी प्रेरित होऊन विविध क्षेत्रात अशा वैशिष्ट्यांनी कामगिरी करणार्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या भावनेतून थिंक प्युअर पुरस्कार आम्ही चार वर्षांपूर्वी सुरू केले. थिंक प्युअर सोशल वेलफेअर फौंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आम्ही राबवत आहोत.येत्या दिवाळीपर्यंत नव्याने पाच फ्रँचायझी सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरस्कारांची विभागणी विविध श्रेणीअंतर्गत करण्यात आली होती. त्यामध्ये आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार विशेष सरकारी वकील व पद्मश्री उज्वल निकम यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी डॉ.भार्गवी दावर, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरूण निगवेकर,कला क्षेत्रातील कार्याबद्दल राहुल देशपांडे, व्यावसायिक क्षेत्रातील कार्याबद्दल दीपक छाब्रिया, क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल केदार जाधव आणि पब्लिक सर्व्हिस क्षेत्रातील कार्यासाठी रविंद्र सेनगावकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात गायक राहुल देशपांडे आणि त्यांच्या टीमने गायनाचा कार्यक्रम सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलेे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर आभार प्रदर्शन पराग गाडगीळ यांनी केले.