पुणे विमानतळाचा नवा विक्रम ; नोव्हेंबरमध्ये 9 लाखांहून अधिक प्रवाशांनी घेतली भरारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाने नोव्हेंबर महिन्यात विक्रमी प्रवासी संख्या नोंदवली आहे. या महिन्यात एकूण 9 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते, ज्यामध्ये 8.80 लाख प्रवासी देशांतर्गत होते तर 20,554 प्रवासी आंतरराष्ट्रीय होते. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये 44% वाढ झाली असून देशांतर्गत प्रवाशांमध्ये 5% वाढ झाली आहे. यात 8.44 लाख घरेलू प्रवासी आणि 14,238 आंतरराष्ट्रीय प्रवासी होते.

नोव्हेंबरमधील प्रवासी संख्या सर्वाधिक –

नोव्हेंबरमधील प्रवासी संख्या या वर्षातील सर्वाधिक असून यापूर्वी मे महिन्यात 8.94 लाख प्रवाशांचा विक्रम झाला होता. पुणे विमानतळाचे संचालक संतोष धोके यांनी नवीन उड्डाणे आणि प्रादेशिक संपर्क वाढीच्या उपक्रमांमुळे ही वाढ झाल्याचे सांगितले आहे . या वाढीचे श्रेय नवीन उड्डाणे सुरू करण्यास आणि शहराच्या आंतरराष्ट्रीय व घरेलू प्रवेशासाठी सुरू केलेल्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी उपक्रमांना दिले, ज्यामुळे पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून प्रवास करणे अधिक सोयीस्कर झाले आहे .

तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी पाच उड्डाणे –

सध्या पुणे विमानतळावरून सिंगापूर, बँकॉक आणि दुबई या तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी पाच उड्डाणे सुरू आहेत. याशिवाय एका दिवसात 102 आगमन आणि 102 प्रस्थानांची विक्रमी नोंदही विमानतळाने केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या सुविधा आणि ऑपरेशनल व्यवस्थापन नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीत (NITB) हलविण्यात आले आहे. पण इंडिगो आणि FLY91 सारख्या देशांतर्गत विमान कंपन्या अजून जुन्या टर्मिनलवरून कार्यरत आहेत. लवकरच त्या नव्या टर्मिनलमध्ये हलविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव –

महाराष्ट्र विधानसभेने नुकत्याच घेतलेल्या ठरावानुसार पुणे विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याचा प्रस्ताव केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. या नामांतराचा उद्देश विमानतळाच्या वाढत्या महत्त्वाला अधोरेखित करणे असून, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ करते आहे.