Pune Crime : पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षणाचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात (Pune Crime) मागील काही महिन्यापासून कायदा सुव्यस्था पुरती बिघडली आहे. पोर्शे कार अपघात, ससून ड्रग रॅकेट, कोयता गॅंगमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी बनललेया पुण्यातुन आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. पोलिसांनी एका वाहन चालकाला थांबवलं. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. याच दरम्यान, वाहनातील एकाने संबंधित महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने त्याच्या हातातील लाईटर पेटू न शकल्याने पुढील दुर्घटना टळली आहे. या प्रकरणी आरोपी संजय फकीरा साळवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातून गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. या घटनेत चक्क पोलिस अधिकाऱ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळं पुन्हा एकदा पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पुण्यात वाहतूक पोलीस सुद्धा सुरक्षित नाहीत का? पुण्यातील कायदा व्यवस्था वेशीला का टांगली गेली आहे? तसेच पुण्यात आणखी काय काय बघायला मिळणार असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकाकडून केला जात आहे.