पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील आकुर्डी परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. बोलतात ना प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. याचाच प्रत्यय पिंपरी-चिंचवडमध्ये आला आहे. या घटनेत एका प्रेमविवाह झालेल्या जोडप्यामध्ये कौटुंबिक कारणावरून भांडण झालं अन् संतापाच्या भरात पतीने पत्नीला थेट रस्त्यावर आपटले. या प्रकरणाची माहिती निगडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी दोघांना बोलवून समज दिली.
यानंतर पोलिसांनी महिलेला पतीविरोधात तक्रार आहे का?, अशी विचारणा केली असता तिने पोलिसांना कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. यामुळे या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिली आहे. या दोघा पतीपत्नींमध्ये नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास जोरदार भांडण झाले. यानंतर आकुर्डी येथे ड्युटीवर निघालेल्या पत्नीला पतीने भररस्त्यातच गाठले आणि त्याने तिच्या मानेला पकडून रस्त्यावर आपटलं. हा संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पतीने भररस्त्यात पत्नीला उचलून आपटलं pic.twitter.com/VeeSM0AsUT
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 6, 2022
हे दोघे पती -पत्नी नोकरी करतात, नवरा हा सुरक्षारक्षक आहे तर पत्नी एका मॉलमध्ये काम करते. पत्नी घरी लवकर यायची मात्र पती हा सुरक्षारक्षक असल्याने त्याला घरी येण्यास वेळ व्हायचा. या कारणावरून दोघांमध्ये दररोज भांडण व्हायचे. याच रागातून पतीने भररस्त्यातच पत्नीला आपटले आहे. हि सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी याची दखल घेतली. मात्र या महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी दोघांचे समुपदेशन केले आणि सुखाने संसार करण्याचा सल्ला दिला. यानंतर या दोघांनी यापुढे भांडणार नाही असे आश्वासन पोलिसांना दिले.