पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आणि दुर्गम भागांमध्ये आता ‘हवाई रज्जू मार्ग प्रकल्प’ म्हणजेच रोप वे उभारण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सिंहगड, शिवनेरी आणि राजगड किल्ल्यासह जेजुरी, निमगाव खंडोबा, लेण्याद्री आणि भीमाशंकर येथे रोप वे तयार होणार आहे. यामुळे पर्यटक आणि भाविक अवघ्या काही मिनिटांत मंदिर आणि गड-किल्ल्यांवर पोहोचू शकतील.
पुणे जिल्ह्यातील ८ ठिकाणी रोप वे प्रकल्प
सिंहगड किल्ला
शिवनेरी किल्ला
राजगड किल्ला
भीमाशंकर
लेण्याद्री
जेजुरी (कडेपठार)
खंडोबा निमगाव (ता. खेड)
दाऱ्याघाट (ता. जुन्नर)
पर्यटन आणि धार्मिक स्थळांना मोठी चालना
राज्यातील विविध पर्यटन स्थळांवर रोप वे उभारण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. त्यानुसार ४५ ठिकाणी रोप वे प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यातील ८ ठिकाणे पुणे जिल्ह्यातील आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग ३ ठिकाणी रोप वे उभारणार आहे. तर राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ५ ठिकाणी प्रकल्प उभारणार आहे.
प्रकल्पासाठी ३० वर्षांची लीज व्यवस्था
पुणे जिल्ह्यातील रोप वे प्रकल्पासाठी लागणारी जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची असल्यास, ती ३० वर्षांसाठी NHLML कंपनीला भाडेपट्ट्याने दिली जाणार आहे. इतर विभागांच्या जमिनी हस्तांतरित करून बांधकाम विभागामार्फत भाडेपट्ट्यावर दिल्या जातील. सरकारचा रोप वे प्रकल्पात इक्विटी हिस्सा असेल, मात्र निधीची तरतूद अद्याप मंजूर नाही.
खंडोबा निमगाव येथे ३३ कोटींचा प्रकल्प मंजूर
खंडोबा निमगाव येथे रोप वे प्रकल्पाची संपूर्ण मंजुरी मिळाली आहे आणि त्यासाठी तब्बल ३३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
इतर प्रकल्पांसाठी निधीची तरतूद अद्याप केली गेलेली नाही.
पर्यटन आणि धार्मिक स्थळांचे महत्त्व वाढणार
राज्य सरकार आणि NHLML यांच्यातील करारांतर्गत ‘पर्वतमाला योजना’द्वारे रोप वेच्या कामाला गती मिळणार आहे. राज्यातील २९ रोप वे प्रकल्प NHLMLकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे पर्यटकांना अधिक सुलभ प्रवास मिळेल, पर्यटन उद्योगाला चालना मिळेल आणि ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व वाढेल.