शरद पवारांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; पुण्यातील दुष्काळी परिस्थितीवरून केली ‘ही’ मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना पत्र लिहिलं आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी शरद पवारांनी आपल्या पत्रात केली आहे.

शरद पवारांचे पत्र जसेच्या तसं –

प्रिय मुख्यमंत्री,
मी दिनांक १२-१३ जून २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. अल्प पर्जन्यमान असलेल्या ह्या भागातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यशासनाने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत. मात्र दौऱ्यावेळी शेतकरी- ग्रामस्थांशी संवाद साधला असता सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे दिसून आले. जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा या करिता ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजना देखील सुचवल्या. सदर समस्या आणि मागण्यांबाबत प्रकल्प निहाय व गावनिहाय स्वतंत्र टिप्पणी सोबत जोडली आहे. कृपया टिप्पणीचे अवलोकन व्हावे. (Sharad Pawar Letter To Eknath Shinde)

पुणे जिल्ह्यातील उपरोक्त तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपणास विनंती कि, आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन व्हावे. उक्त बैठकीस संबंधित विभागाचे सचिव व अधिकारी यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात व स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रीत करावे. सदर बैठकीवेळी दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासंदर्भात चर्चा घडून यावी तसेच कायस्वरूपी उपाययोजने संदर्भात चर्चा आणि नियोजन व्हावे अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो.

कळावे.
शरद पवार